हस्ताक्षरातून माणसं वाचताना..

Author: Kshitij Nirgude
Date: 24th February 2024

एखादी अनोळखी कादंबरी हातात घ्या. कुठलंतरी मधलंच पान उघडा, आणि वाचायला सुरुवात करा.
काही संदर्भ लागतोय? नाही? ठीके, पुढे वाचत राहा.

१-२ पानं झाली. आता थोडंफार समजायला लागलं असेल ना? नायकाची ओळख झाली ना? चांगलंय. वाचा पुढे.

काय झालं? तुमच्या आवडत्या नायकानं अचानक हे असं पाऊल का उचललं?
नक्की काय झालं, की ज्यामुळं तो हे असं काहीतरी करायला प्रवृत्त झाला?

कुठं शोधणार या प्रश्नांची उत्तरं?

अर्थातच, ज्या पानापासून तुम्ही कादंबरी वाचायला सुरु केली, त्या आधीची पानं!

ती वाचली, की तुम्हाला त्या नायकाची बाजू पूर्णपणे कळेल, आणि आता तुम्ही त्याला पूर्णपणे समजून घ्याल.

आपलं आयुष्य म्हणजे तरी काय वेगळं आहे बरं? एक भलीमोठी लायब्ररी असते ती.

आणि आपल्या आयुष्यातली माणसं म्हणजे त्या लायब्ररी मधल्या कादंबऱ्या !

प्रत्येकजण आपापल्या जीवनाचं एखादं पान जगत असतो.

आपण जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपण तिला तिच्या चालू पानापासून वाचायला सुरुवात करतो.

मग पुढची काही पानं वाचून झाली, की आपण तिला ओळखायला लागतो.

पण खरंच आपण त्या माणसाला “जाणतो” का?

नाही. नक्कीच नाही.

त्याला जर जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्या आयुष्याची पूर्वीची पानं वाचणं गरजेचं असतं.

आणि इथं मदत होते Handwriting Analysis ची.

एखाद्या व्यक्तीचं हस्ताक्षर बघून तिचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला समजू शकतंच; पण त्यापुढेही जाऊन, त्या व्यक्तीचा स्वभाव तसा ‘का’ आहे, याचाही अंदाज आपल्याला येतो. आणि मग साहजिकच, आपण त्या व्यक्तीला नीट जाणून घेऊ शकतो.

हस्ताक्षर वाचता वाचता, आपण तो माणूसही वाचायला शिकतो.

आणि एकदा आपण माणसं वाचायला लागलो, की एक वेगळीच शांतता जाणवू लागते.
‘त्या दिवशी तो मला असं का बोलला’, ‘ही माझ्याशी असं का वागते’ – असे अनेक प्रश्न आपोआप सुटू लागतात.

या प्रश्नांनी गढूळ झालेलं आपलं मन, आता हळूहळू निवळू लागतं.

आणि मग, त्या नितळ पाण्यात, आता आपण स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकतो.

आपल्या अक्षरातून, आता आपण स्वतःची कादंबरी वाचू लागतो.

तिची आधीची पानं उलगडून पाहतो.

आपल्याच कथेत लपलेली गुपितं आता हळूहळू लक्षात येऊ लागतात.

आपल्याच व्यक्तिमत्त्वातील काही पैलू नव्याने चमकू लागतात.

काही ओबडधोबड बाजूही लक्षात येतात.

आणि मग सुरुवात होते, त्या ओबडधोबड बाजूंना तावून सुलाखून लख्ख करण्याची!

या सगळ्या प्रवासामध्ये आपण स्वतःचे सोबती होतो, आणि स्वतःला “जाणायला” लागतो –

तुका म्हणे होय मनासी संवाद |

आपुलाचि वाद आपणासी ||

असाच एक स्व-संवाद साधताना सुचलेल्या काही ओळी –

अक्षराची तुम्हा काय सांगावी महती |

सजवले मोती कागदावरी ||

विचार बोलतो शब्दांमधूनि |

मन अक्षरातून बोलतसे ||

ओळखता येतो स्वभाव मनाचा |

न्याहाळून कळती कारणेही ||

जादूच वाटे जणू जगताला |

अपार आपुले कौतुक होई ||

कौतुकाचे धनी वाहती गर्व मोठा |

वेळीच तयाला आवर घालू ||

पुरे झाले आता जगाचे पाहून |

आता जरासे अंतरी डोकवूया ||

स्वतःच्या उरीचा स्वतः ठाव घेऊ |

करू सार्थ नाव “आत्मनाचे” ||

Content presented in this blog cannot be copied and cannot be used in any sort of documents & products, or for promotional purposes without the permission of Aatman Graphology. Breach of this copyright will illicit legal action.