अक्षर नव्याने गिरवताना...
एका शाळेतल्या शिक्षकासाठी त्याच्या वर्गाला सामोरं जाणं हे सोपं काम नाही. तुम्ही तुमचा विषय कसा शिकवणार, त्यासाठी वेळ कसा वापरणार, काय काय तंत्र वापरणार, याचे मनोरे तुम्ही मनात उभारून आलेले असता. पण तुमच्या समोरचा विद्यार्थी समुदाय एका वेगळ्याच zone मध्ये असतो. कुणी जांभई देऊन तुमचं स्वागत करतं. कुठली तरी चार टाळकी आपापसात काहीतरी कुजबुजत असतात (तुम्ही नवखे असाल, तर ते आपल्याबद्दलच बोलतायत असं वाटत राहातं.) तर वर्गातले पटाईत विद्यार्थी तुमच्या दोन पावलं पुढं राहात, तुम्हालाच बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारतात. त्यामुळे तुमच्या मनातले ते मनोरे कधी Jenga च्या मनोऱ्यासारखे कोसळतील, याचा काही नेम नाही. त्यामुळे परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली आहे, ही भावना शिक्षकासाठी अतिशय गरजेची ठरते.
ही भावना कशी निर्माण करायची? करड्या शिस्तीचे शिक्षक म्हणतील की मुलांवर जरब हवी. नियोजनबद्ध शिक्षक हे विषयावरची पकड व पद्धतशीर आखणीवर भर देतील. तर काही शिक्षक विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण वातावरण तयार करण्याकडे झुकतं माप देतील. हे सर्वच मार्ग केव्हा ना केव्हातरी नक्कीच उपयोगी पडतात. पण यात एक अतिशय महत्वाची पायरी असते, ती म्हणजे तुमच्या समोरच्या विद्यार्थ्याचं मन शक्य तेवढं जाणून घेणं.
व्यक्ती तितक्या प्रकृती. एका विद्यार्थ्यासाठी रामबाण ठरलेली पद्धत दुसऱ्या कुठल्या विद्यार्थ्याबरोबर सपशेल निरुपयोगी ठरू शकते. त्यात ३५-४० जणांना एकाच वेळी शिकवण्याची मर्यादा शिक्षकावर असते. मग अश्यावेळी तुमच्या दिमतीला जर एखादं असं साधन असेल, जे तुम्हाला समोरच्याच्या मनाचा ठाव घ्यायला साहाय्य करेल, तर त्याचा पुरेपूर वापर करायला काही हरकत नसावी. असंच एक साधन म्हणजे graphology, अर्थात handwriting analysis!
सुरुवातीलाच हे स्पष्ट करायला हवं की, विद्यार्थ्याचं अक्षर “सुधारणं” हे इथे अपेक्षित नाही. किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीप्रमाणे, विद्यार्थ्यावर गुणी किंवा बदमाश असा शिक्का मारणं, हा ही उद्देश इथे नाही. उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थ्याची स्वभावरचना समजून घेणं आणि त्याचबरोबर ती तशी का असेल याचा अंदाज बांधणं. “का” नीट समजला, तर “कसं” चं उत्तर हे अजून स्पष्ट होईल.
विद्यार्थ्याच्या स्वभावातल्या कुठल्या बाजू न्याहाळणं सोयीचं ठरू शकतं? अर्थातच अनेक. पण काही ठळक बाजू मात्र वारंवार विचारात घ्याव्या लागतात.
अवधान क्षमता (attention span), एकाग्रता, स्वस्थता:
तास नीट पार पडण्यासाठी आवश्यक असलेला हा कदाचित सगळ्यात प्राथमिक व सगळ्यात महत्वाचा घटक. वर्गाचं लक्ष तुमच्याकडे दीर्घकाळ खिळवून ठेवणं मुळातच महाकठीण. त्यात जर मूल ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारख्या समस्यांना तोंड देत असेल, तर ते आवरता आवरत नाही. दुर्दैवाने अश्या मुलांवर विशेष चिकित्सा न करता मस्तीखोर असल्याचा शिक्का मारला जातो. किंवा अगदी ADHD ची बाधा जरी नसली, तरी काही मुलांना मुळातच स्वस्थ राहाणं, एका चाकोरीतल्या गोष्टी सतत करणं, हे कठीण जातं. या उलट काही विदयार्थ्यांची बैठक, एकाग्रता मात्र विलक्षण पक्की असते. या विद्यार्थ्यांची धारण क्षमता अर्थातच अधिक असायची शक्यता असते.
(अक्षरात यासाठी काय पाहिले जाते: आकार, तिरकसपणा (slant), दाब).
वरिष्ठांशी असलेले नाते (Equation with authority figures):
वर्गात काही विद्यार्थी असे असतात ज्यांना नियम-बियम काही मंजूर नसतात. उलट ते तोडण्याची त्यांचात एक खुमखुमीच असते. चाकोरीचा त्यांना तिटकारा असतो. त्यांच्या नजरेत, आवाजात, देहबोलीत एक बेदरकारपणा असतो. तर याउलट काही विद्यार्थी असे असतात, जे शिक्षकाकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी आसुसलेले असतात. प्रश्न पूर्ण व्हायच्या आत यांचा हात विजेच्या वेगाने वर जातो. यांची सर्व कामं वेळच्यावेळी पूर्ण. वह्या अत्यंत नीटनेटक्या.
हे असं का होतं? वरिष्ठांशी आपलं नातं कसं घडत जातं? उत्तर हे बहुसंख्यवेळा आपल्या बालपणात दडलेलं असतं. जडणघडणीच्या वयात अधिकाराच्या पदावर असलेली पहिली व्यक्ती आपण कोण पाहतो? प्रामुख्याने, आपले पालक. त्यात सुद्धा, अनेक घरात ही जागा वडलांनी घेतली असते. मग लहान वयात मनावर कोरलं गेलेलं तेच रूप हे इतर वरिष्ठांमध्ये दिसू लागतं. पालकांबरोबर असलेल्या नात्याची रूपरेषा कशी असते, यावर अक्षरामधून खूप प्रकाश पडतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं वर्तन पाहताना अक्षराची मदत मोलाची ठरते.
(अक्षरात यासाठी काय पाहिले जाते: स्वाक्षरी, दाब, ‘e’, ‘t’, ‘I’, रकाने (margins))
जबाबदारीची जाणीव:
काही विद्यार्थी असे असतात, ज्यांच्यावर एखादं काम सोपवलं, की अवतीभोवतीचे निःशंक असतात. गटकामात ते कायम पुढाकार घेणार. मग अनेकदा इतर लोक त्यांच्यावर काम टाकून मोकळे! आणि इतरांकडे काम सोपवलं की ते नीट होईल की नाही याबाबत त्यांना कायम धास्ती असते. अश्या विद्यार्थ्यांची किती मदत होते, हे बरेचसे शिक्षक पण (काहीसे ओशाळून) मान्य करतील.
(अक्षरात यासाठी काय पाहिले जाते: ‘s’, शब्दाच्या सुरुवातीला येणारे strokes, अक्षराचा आकार)
इतर मुलांशी जुळवून घेणे:
काही विद्यार्थी हे अभ्यासात थोडे पुढे मागे जरी असले तरी त्यांच्यात लोकांशी कसं वागायचं याची कौशल्ये ही सरस असतात. तर काही जणांना थोडी पण तडजोड करणं अवघड जातं. काही जणांना एकटं पडायची विलक्षण भीती असते, जे टाळण्यासाठी ते टोकाची पावलं उचलतात. तर काही जणांना आपली शांतता, आपला कोष हा खूप प्रिय असतो. हे गुण दरवेळी वर्गखोलीत असताना दिसतीलच असं नाही. पण वर्गाचं वातावरण, वर्गाचं स्वास्थ्य हे या गोष्टींवर पुष्कळसं अवलंबून असतं.
(अक्षरात यासाठी काय पाहिले जाते: आकार, तिरकसपणा, अक्षरांमधली जोडणी (connections), शब्दांमधील अंतर)
मनःस्थिती मधले चढउतार
काही मुलांचे चेहरे व देहबोली हे अतिशय पारदर्शक असतात. तर काही मुलं आपल्या मनातलं किती खुबीने झाकून ठेऊ शकतात, हे पाहून थक्क व्हायला होतं. कधी कधी अतिशय गंभीर स्वरूपाच्या गोष्टी पण मुलं तुमच्यापासून लपवून ठेवतात. मग त्यामध्ये चिंता, नैराश्य, स्वतःला इजा पोचवणे, या गोष्टींचा पण समावेश होतो. या गोष्टी हुडकून काढणं हे अतिशय गुंतागुंतीचं काम असतं. पण तरी काही प्रसंगात इथे अक्षराची मदत होऊ शकते.
(अक्षरात यासाठी काय पाहिले जाते: ओळींमधले काही ठराविक चढ-उतार, अक्षराचा नीटनेटकेपणा, शाई उमटण्यामधली सम-विषमता, इ.)
मुलांच्या वागण्यातले असे अनेक बारकावे आपल्या समोर उभे ठाकलेले असतात. पण ते हेरण्यासाठी शिक्षकाची दृष्टी तीक्ष्ण असावी लागते. समोरच्या एखाद्या झाडावर पक्षी बसला जरी असला, तरी प्रत्येक व्यक्ती त्याला हुडकून काढू शकत नाही. त्यासाठी कधी कधी पक्षीनिरीक्षण तज्ञच लागतो. किंवा आकाशात तारे कितीही दिसोत, त्यात नक्षत्र शोधून काढायला कसब लागतं. तीच गत माणसाच्या स्वभावाची! पण एकदा का ती नजर तयार झाली, की छोट्या छोट्या प्रसंगातून पण व्यक्तीच्या स्वभावाचा एक अधिक स्पष्टसा आकार आपल्याला दिसायला लागतो. ती नजर तयार करण्यात graphology ची होणारी मदत ही बहुमोल आहे!
त्यामुळे एखादा शिक्षक एखाद्या वर्गाशी नव्याने नातं बांधत असताना, जेव्हा विद्यार्थ्यांच्या स्वभावातले कंगोरे, खाच-खळगे नीट हेरू शकतो, तेव्हा त्याची वाटचाल खूपच सुसह्य होते. पावलं अधिक दमदार पडतात.
जाता जाता, हा पण एक विचार येतो, की ही कला आत्मसात करण्यामागे, शिक्षकाला आत्मविश्वास वाटणं हा एवढासाच हेतू नाही. ज्या विद्यार्थ्यांमध्ये तो वावरतो आहे, त्यांचं जग कोणीतरी समजून घेणं, ही त्यांची पण गरज आहेच ना? एखादं मूल “असं वागूच कसं शकतं?” या पेक्षा ते मूल “असं का बरं वागत असेल?” हा प्रश्न अनेक दारं उघडतो. ते म्हणतात ना, connection before correction!
मग ते connection दोन व्यक्तींमधलं असो, किंवा दोन अक्षरांमधलं.
_____________________________________
जरब = intimidation
न्याहाळणं = to observe
ठाव घेणे = to get a hang of something, getting an idea
दिमतीला = at your disposal
चाकोरी = convention, road frequently travelled
तिटकारा = disdain
बेदरकारपणा = defiance, not caring
ओशाळून = sheepish, embarrassed
कोष = shell
कंगोरे = edges, grove
Content presented in this blog cannot be copied and cannot be used in any sort of documents & products, or for promotional purposes without the permission of Aatman Graphology. Breach of this copyright will illicit legal action.